Thursday, June 30, 2016

शहरातील १५० धोकादायक इमारतींमध्ये अद्याप रहिवाशांचे वास्तव्य

वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधवारी पहाटे नालासोपाऱ्यातील आत्मवल्लभ सोसायटीमधील १६ क्रमांकाच्या इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पालिकेने शहरातील १५० इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले असले, तरी अद्याप त्यात रहिवाशांचे वास्तव्य कायम आहे.
नालासोपारा येथे आत्मवल्लभ सोसायटी असून त्यात एकूण २३ इमारतीे होत्या. ३५ वर्षांपूर्वी ही सोसायटी आत्मवल्लभ जैन उत्कर्ष सोसायटीने बांधली होती. या सोसायटीमधील इमारती जीर्ण अवस्थेत असून पालिकेने त्या यापूर्वीच धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. त्यापैकी दोन इमारती यापूर्वीच पाडण्यात आलेल्या आहेत. ५०२ घरांपैकी अनेक जण येथून स्थलांतरित झाले असून अजूनही ९० कुटुंबे या इमारतीत राहत आहेत. बुधवारी सकाळी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सोसायटीमधील इमारत क्रमांक १६ची गॅलरी अचानक कोसळली. सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या इमारतीत एकूण तीन कुटुंबे राहत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. या तीनही कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांपासून या सोसायटीला पालिका नोटिसा बजावत होता. या सोसाटीचा फेरबांधणीचा प्रस्ताव वादामुळे रखडलेला आहे. गेल्या वर्षी या सोसायटीमधील एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या.
शहरात १५० अतिधोकादायक इमारती
वसई-विरार शहरात २५० धोकादायक इमारती असून त्यातील १५० इमारती या अतिधोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. तशा नोटिसा संबंधित इमारती तसेच स्थानिक पोलिसांना देण्यात आलेल्या होत्या. परंतु अद्याप त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाही. या सर्व रहिवाशांना बाहेर काढून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home