Sunday, June 26, 2016

दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर - भगवान खैरनार - सकाळ वृत्तसेवा

दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर
- भगवान खैरनार - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जून 2016 - 01:15 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=U9V49b
  

मोखाडा - मुंबईत घातपात घडविण्याच्या कटाप्रकरणी अटक झालेल्या दहशतवाद्यांना सोडविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील गरीब, अशिक्षित आदिवासींचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती समजली आहे. या आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखवत किंवा कर्ज काढून देतो, असे सांगत त्यांच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर दहशतवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी केला जात आहे. ही बनावट कागदपत्रे बनविणारे दहशतवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात सक्रिय आहेत. 

दहशतवाद्याला जामीन राहताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी मोखाडा तालुक्‍यातील जोगलवाडी या खेड्यातील भीमा सारक्ते या अशिक्षित आदिवासीला सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे त्याच्या भावाने मिळविलेल्या माहितीनंतर हे उघडकीस आले. 

मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी 5 डिसेंबर 2014 रोजी बाबू अब्दुल हक खान या दहशतवाद्याला अटक केली होती. त्याला जामीन राहण्यासाठी दहशतवाद्यांच्या हस्तकांनी भीमाला कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. नंतर त्याच्या नावाचा बनावट ऐपतीचा दाखला, तसेच शशिकांत जाधव नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची बनावट सही असलेला मोखाडा पोलिस ठाण्याचा दाखला बनविण्यात आला. त्या दाखल्यावरील सरकारी शिक्केही बनावट होते. बाबू खानला जामीन मिळवून देण्यासाठी ही कागदपत्रे 15 डिसेंबर 2014 रोजी माझगाव येथील 15 व्या महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार पडताळणीत ती कागदपत्रे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने खान याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर न्यायालयाने 18 डिसेंबर 2014 रोजी या प्रकरणी फेरचौकशीचे आदेश काळाचौकी पोलिसांना दिले. त्यानुसार काळाचौकी पोलिसांनी मोखाडा तहसील कार्यालय, तसेच मोखाडा पोलिसांशी संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी केली. त्या वेळी मोखाडा पोलिस, तसेच तहसीलदारांनी शशिकांत जाधव नावाचा अधिकारी कधीही नव्हता; तसेच कागदपत्रांवरील शिक्काही आमच्या कार्यालयाचा नाही, असे स्पष्ट केले. 

न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी भीमा सारक्तेविरोधात 24 डिसेंबर 2014 रोजी रफी अहमद किडवाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 5 जानेवारी 2015 रोजी त्याला पोलिसांनी अटक केली. सहा महिने तो ऑर्थर रोड तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात भीमाच्या कुटुंबीयांनी मोखाडा पोलिस ठाण्यात दाद मागितली; मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार मान्य केली नाही. अखेर भीमाचे बंधू नामदेव सारक्ते यांनी खटपट करत 16 जून 2016 रोजी त्याला जामीन मिळवून दिला. 

त्यानंतर नामदेव यांनी या प्रकरणी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील कासारवाडी परिसरात पोलिसांनी 14 सप्टेंबर 2014 रोजी शफीक अस्लम खान (वय 21), फजाईल अहमद ऊर्फ दानिश बागहुसेन खान (20), माजिद फरीद खान (21), मजहर हुसेन मोहम्मद खान (21), अश्‍फाक मोहम्मद अस्लम खान (30), मोहम्मद शकील मोहम्मद शेख (28) या काश्‍मिरी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या जामिनासाठी मोखाडा परिसरातील आदिवासींचा वापर केला गेल्याची माहिती नामदेव यांना मिळाली. 

पाचशे-हजार रुपयांवर बोळवण 
आपण कुणाला जामीन राहत आहोत, याची कल्पना नसलेल्या आदिवासींना न्यायालयात नेत असत. तिथे त्यांच्या स्वाक्षऱ्या-अंगठा घेऊन दहशतवाद्यांना जामीन मिळवून दिला जात असे. नंतर या आदिवासींच्या हातावर पाचशे-हजार रुपये टेकवून त्यांची बोळवण केली जात असे. 

कर्ज मिळवून देतो, असे सांगत खोडाळा गावातील अस्लम पठाण आणि अनसूया गोरे यांनी माझ्याकडील कागदपत्रे मागितली. कागदपत्रे दिल्यानंतर त्यांनी मला मुंबईत नेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयात मी नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी मला पाचशे रुपये देऊन घरी पाठवले. त्यांनीच माझ्या नावाची बनावट कागदपत्रे बनवली. मी अशिक्षित असल्याने मला काहीही समजले नाही. 
- भीमा सारक्ते, आदिवासी, जोगलवाडी, पालघर

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home